आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
पूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!
तहसीलदारांचीही दिशाभूल;जिल्हाधिकार्यांचे मौन
Related News
गणेश खडसे
यवतमाळ : आर्णी तालुक्यात महिनाभराच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना, आर्णी तालुक्यातील 3 मंडळ अधिकारी आणि 11 तलाठी दक्षिण भारताच्या सहलीवर जाऊन ‘मौज’करत असल्याची संतापजनक माहिती उघडकीस आली आहे. या प्रशासकीय बेशरमपणाने संतप्त शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून आमच्या शेतातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न शेतकरी बांधवांनी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी मात्र मौन बाळगले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातही आर्णी तालुक्यात अरुणावती, अडाण आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या महापुरामुळेहजारो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीनची पिके पाण्याखाली जाऊन सडली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे खचला असून, आत्महत्येच्या विवंचनेत आहे. त्याला अपेक्षा आहे शासनाच्या मदतीची, पण मदत मिळणार कशी? कारण ज्यांच्यावर पंचनाम्याची जबाबदारी आहे, तेच कर्मचारी पूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून दक्षिण भारतात सहलीवर गेले आहेत. आर्णी तहसील कार्यालयातील तब्बल 3 मंडळ अधिकारी आणि 11 तलाठी सध्या केरळमध्ये महाराष्ट्र तलाठी संघाच्या अधिवेशनाच्या नावाखाली ‘मौज-मजा’ करीत असल्याची धक्कादायक माहिती तहसील कार्यालयातीलच एका वरिष्ठ लिपिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. संतप्त शेतकरी दररोज पंचनाम्याची विचारणा करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारत असताना, त्यांना 11 तलाठी साजे बंद आढळत आहेत. त्यामुळे आल्यापावली शेतकर्यांना निराशेने परत जावे लागत आहे. या भयंकर परिस्थितीतही कर्मचारी जागेवर नसल्याने नागरिकांचा उद्रेक होत आहे. काही सुज्ज्ञ नागरिकांनी तहसीलदारांना याबाबत जाब विचारला असता, त्यांनी हे सर्वजण ‘प्रशिक्षणासाठी’ गेल्याची खोटी माहिती देऊन शेतकर्यांची आणि नागरिकांची उघडपणे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्यांनी स्वतः माहिती काढल्यावर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आणि तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. असे असतानाही, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून हे कर्मचारी सहलीवर कसे गेले, त्यांना परवानगी कोणी दिली, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या अत्यंत गंभीर प्रकाराबाबत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मौन बाळगले आहे, तर स्थानिक तहसीलदार माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.
रेती तस्करांकडून रसद?
आर्णी तालुक्यातून वाहत जाणार्या अडाण, अरुणावती, पैनगंगा नदी पात्रातील घाटाचे काही दिवसातच लिलाव होणार आहे. या लिलावात रेती तस्करांना मदत करण्यासाठी या महसूल कर्मचार्यांना रसद पुरविण्यात आल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. यामधून दक्षिण भारत भ्रमण करून मौज करण्यासाठी तहसील कार्यालयातील हे मंडळ अधिकारी तसेच तलाठी रजा टाकून निघून गेले आहे.
जिल्हाधिकार्यांचे मौन
आर्णी तहसील कार्यालयातील संबंधित माहिती देवून प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हाधिकारी विकास मीना यांना यावर प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी यावर मी यासंदर्भात काहीही बोलू शकत नाही, असे सांगितले.
संबंधित कर्मचार्यांवर कारवाई झालीचपाहिजे: आमदार बाळासाहेब मांगुळकर
शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांनी त्रस्त झाले आहेत. त्यातच शासनाचे अधिकारी मौज करण्यासाठी जात असेल तर यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांना जाब विचारणार असल्याचे यावेळी काँग्रेसचे आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी दैनिक ’अंजिक्य भारत’ला दिली.
सरकारच आधळं बहिरे : खासदार देशमुख
सरकार आंधळं बहिरे झाले. अधिकार्यांमध्ये शेतकर्यांबाबत आपुलकी नाही. अधिकारी अशा परिस्थितीत सहलीला जात असेल तर ही फार गंभीर बाब आहे. अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही वाहून गेले त्यांचे अद्याप मृतदेह सापडले नाहीत. शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत हवी आहे. परंतु, शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. पंचनामे केवळ फार्स आहेत. त्यामुळे आता शेतकरीच सरकारला धडा शिकवतील.
खासदार संजय देशमुख,यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ
read also : https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbancha-motha-gaupyasti/
