कर्नाटकच्या राजधानी बंगळुरुमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. योग शिकवणाऱ्या केंद्राचा प्रमुख असलेला योग गुरु निरंजन मूर्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीसह आठ महिलांवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक आरोप त्याच्यावर झाले आहेत.
१७ वर्षीय मुलीची धाडसामुळे प्रकरण बाहेर
राजराजेश्वरी नगर येथील पोलीस ठाण्यात १७ वर्षीय मुलीने थेट तक्रार दाखल केली. मुलीने सांगितले की, योग शिकण्याच्या बहाण्याने निरंजन मूर्ती तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ गुन्हा नोंदवून POCSO कायद्यान्वये (Protection of Children from Sexual Offences Act) आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी महिलांचा शिकारी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी योग गुरु राजराजेश्वरी नगरमध्ये एक योग केंद्र चालवतो. त्याच्या क्लासेसला येणाऱ्या महिला व युवतींवर त्याची वाईट नजर असे. चौकशीत असेही उघड झाले की, त्याने किमान आठ महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपीने अल्पवयीन मुलींसुद्धा वासनेचे शिकार बनवले.सुरुवातीला गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी आवाहन केले आहे की, जर इतर कोणत्याही महिलांवर त्याने अत्याचार केला असेल तर त्या पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारदारांची माहिती गुप्त ठेवली जाईल, असे पोलीस खात्याने स्पष्ट केले आहे.
काही महिन्यांपूर्वी लेक्चरर प्रकरणही
या घटनेने पुन्हा एकदा शैक्षणिक आणि प्रशिक्षण क्षेत्रातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण याआधी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बंगळुरुतच एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या फिजिक्स व बायोलॉजीच्या लेक्चररने मित्रांसह विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता. नरेंद्र (फिजिक्स), संदीप (बायोलॉजी) आणि अनूप अशी आरोपींची नावे असून, त्यांनाही पोलिसांनी अटक केली होती.
पुढील तपास सुरू
योग गुरु निरंजन मूर्तीविरोधातील या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून सध्या सविस्तर चौकशी सुरू असून, आणखी किती महिलांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे याचा शोध घेतला जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/bhusavacha-sajid-bagwan-thar-mitamadhyas-three-women-inclusive/
