पत्रकाराला धमकावणाऱ्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पत्रकाराला धमकावणाऱ्यावर संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

हिवरखेड : हिवरखेड येथील प्रामाणिक वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला गंभीर धमक्या देणाऱ्या राजेश देशमुख या मुजोर ठेकेदारावर आता पत्रकार संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निखिल पाटील करणार आहेत. ही हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार नोंदवण्यात आलेली पहिली तक्रार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रकरणाची सविस्तर माहिती

राजेश देशमुख यांनी अकोट-हिवरखेड जळगाव-जामोद राज्य मार्गावर हिवरखेड आणि खंडाळा फाटा येथे दोन पूलांचे काम घेतले होते. परंतु दिलेल्या कालावधीत ते काम पूर्ण करण्यात अपयशी ठरले. मुदत वाढी नंतरही पूलाचे काम अर्धवट राहिले, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय आणि त्रास सहन करावा लागला.पत्रकाराने हा मुद्दा प्रामाणिकपणे वृत्तांत रूपात मांडल्यावर, ठेकेदाराने वारंवार फोनवर आणि प्रत्यक्ष धमक्या दिल्या, अश्लील शिवीगाळ केली आणि पत्रकाराच्या कुटुंबीयांनाही धोका पोहोचवला. ठेकेदाराने पत्रकाराला हात-पाय तोडण्याची, जिवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

गुन्ह्यात समाविष्ट कलम

ठेकेदाराविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात कलम 296, 351(2) BNS, 351(3) BNS आणि महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान) प्रतिबंध अधिनियम 2017 चे कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयपीएस अधिकारी निखिल पाटील यांनी हिवरखेड येथे भेट देऊन प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेतले, तर हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिलेश्रीराम जाधव यांच्यासह पोलीस स्टाफ तपासात सहकार्य करत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/hyderabad-gazhetwar-rajat-tanav/