किनगांव राजा: येथे गट क्र.५२५ मर्धील एच-क्लास शासकीय जागेवर उभारण्यात येणाऱ्या सौर कृषी वाहिनी प्रकल्पाच्या स्थलांतरासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांचा प्रकल्पाला विरोध नसून केवळ जागा स्थलांतरित करण्याची मागणी आहे. यासोबतच फुले नगर येथील ग्रामपंचायत नमुना आठ अ मधील ‘सरकार’ ही नोंद कमी करून संबंधित नागरिकांची नावे लावावी, तसेच पात्र घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या जागेवर घरकुलांचा लाभ द्यावा अशा मागण्याही उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
या उपोषणाला १५ सप्टेंबरपासून चार ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषणावर बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे यांनी दिली आहे. तपासणीत उपोषणकर्त्यांची शुगर कमी झाली असून रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
आरोग्य विभागाकडून नियमित तपासण्या सुरू असल्या तरी परिस्थिती गंभीर होत चालल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “प्रशासन नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहते काय?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांचा ठाम पवित्रा असून, प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा व उपोषणकर्त्यांचे जीव धोक्यात घालू नयेत, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/vadddivasimitra-gramasbhet-enthusiasts/