मंगरुळपीर मतदार यादीत हजारहून अधिक दुबार नावे; काँग्रेसचा निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे प्रश्न उभा
मंगरुळपीर – मंगरुळपीर शहरातील मतदार यादीत हजाराहून अधिक दुबार नावे असण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद सौदागर यांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी करत लेखी निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त व वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आहे.
माहितीनुसार, मंगरुळपीर शहरात आणि त्याच्या ग्रामीण भागात एकाच व्यक्तीची नावे दुबार (duplicate entry) मतदार यादीत असल्याचे आढळले आहे. विशेषतः, काही कुटुंबे ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित असूनही त्यांच्या मुळ गावच्या मतदार यादीतही नावे कायम ठेवण्यात आली आहेत. काही प्रकरणांत, त्यांची शेती किंवा मालमत्ता मुळ गावी असल्याने मतदार नावे दोन्ही ठिकाणी नमूद आहेत. यामुळे मतदार यादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीसाठी हे प्रचंड मोठे धोका ठरू शकते.
निवेदनात नमूद केले आहे की, Representation of the People Act, 1950 अंतर्गत कलम १७ आणि १८ स्पष्टपणे सांगतात की –
कलम १७: कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त मतदारसंघात नाव नोंदवू शकत नाही.
कलम १८: एका मतदारसंघात एका व्यक्तीची एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करणे मनाई आहे.
जावेद सौदागर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तहसिलदार, मुख्य निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करत तात्काळ दुबार नावे यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी राजकीय हेतूने किंवा अवधानाने दुबार नावे समाविष्ट केल्याचा संशय असल्याने सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.या निवेदनावर माजी नगरसेवक आझमभाई, मोहम्मद अकील मनियार, अब्दुल रज्जाक, शेख जुनेद, मोहंमद फारुख जहुर अहमद यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे.स्थानिक नागरिक आणि पक्षाचे नेते या घटनेला गंभीरपणे घेत असून, निवडणुकीचे निष्पक्ष व नियमबद्ध वातावरण राखण्यासाठी निवडणूक विभागाने तत्पर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.सदर प्रकरणी अधिकारी अधिकृत उत्तर देण्यास अद्याप उदासीन आहेत. मात्र, पुढील तपास आणि कारवाई लवकरच अपेक्षित असल्याचे स्थानिक राजकीय वर्तमाने सूचित करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/kaili-kaji-expressed-rugnalayat-bhetoon/
