अडगाव बु : तेल्हारा तालुक्यातील अडगावात वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वारंवार वीज खंडित होणे, फेज उडणे आणि ट्रान्सफॉर्मरवरील वाढलेला लोड यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, पाणी मोटार यांसारखी महागडी उपकरणे जळण्याच्या उंबरठ्यावर असून अनेक घरांतील वस्तू सतत बिघडत आहेत. गावात मोठ्या प्रमाणावरवीज ग्राहकांची संख्या वाढल्याने बहुतांश डीपी वर क्षमता ओलांडून भार टाकण्यात आला आहे. परिणामी ट्रान्सफॉर्मरवर प्रचंड ताण येत असून फेज टाकल्यानंतरही उपकरणे ‘स्लो मोशन’ मध्ये कार्य करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावांमध्ये एकूण असणाऱ्या डीपी ची देखभाल व दुरुस्तीसाठी कर्मचारी नेमलेले असल्यावर ही किरकोळ बिघाड झाल्यासही तासन्तास वीजपुरवठा बंद राहत असून, ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “आम्ही वीज बिल नियमित भरणारे ग्राहक असूनही,आम्हाला मिळणाऱ्या सेवा, सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न गावकऱ्यांकडून केला जात आहे. ग्रामस्थांनी या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी, अतिरिक्त कर्मचारी नेमावेत आणि ट्रान्सफॉर्मरवरील ताण कमी करण्यासाठी नव्या डीपींची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/donald-trump-mhanale-ace-kadich-ho-new/
