सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांना यश
कुरणखेड – सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून हरवलेल्या ५२ वर्षीय जनार्दन केशव खंडारे यांना शोधून काढण्यात पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांना मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे जनार्दन खंडारे डिसेंबर २०२४ पासून बेपत्ता होते.जनार्दन खंडारे व त्यांची पत्नी अनुसया खंडारे अठरा विश्व दारिद्र्य मोलमजुरी करून संसार चालवत होते. मात्र, मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जनार्दन खंडारे यांना मनो रुग्णाच्या गोळ्या चालू करण्यात आल्या आणि अचानक ते बेपत्ता झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नीने बोरगाव मंजू पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवली. अनेक दिवस तरीही त्यांचा शोध लागलेला नव्हता.या काळात सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनार्दन खंडारे यांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील तरुण सामाजिक कार्यकर्ता तरुण मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात जनार्दन खंडारे चेंबूर मुंबई येथे फूटपाथवर अत्यंत हालाखीत अवस्थेत दिसले.हा व्हिडिओ मुंबईतील सुयोग देशमुख यांचे मित्र व भाजपा तालुका सचिव अमन महल्ले यांना दिसला. त्यांनी त्वरित सुयोग देशमुख यांना माहिती दिली. सुयोग देशमुख यांनी मिश्रा यांच्यासोबत संपर्क साधून संबंधित व्यक्तीची माहिती घेतली असता, ती व्यक्ती मूळचा पैलपाडा येथील जनार्दन खंडारे असल्याचे स्पष्ट झाले.१५ सप्टेंबर रोजी सुयोग देशमुख व वनदीप खंडारे यांनी नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या निवारा सेंटरमध्ये जाऊन जनार्दन खंडारे यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना पैलपाडा गावात सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.या यशामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर करून हरवलेले व्यक्ती शोधणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. चिंतेत असलेल्या अनुसया खंडारे यांनी मदत केलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.प्रवास व दरिद्रतेच्या संघर्षातून आलेल्या जनार्दन खंडारे यांचा सुरक्षित परतावा हे सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी कार्य ठरले असून स्थानिक समाजातही याचे कौतुक होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/multijapurche-chamkat-nave-yash/
