कारंजा (लाड) – आदिवासी क्रांती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढला गेला. या मोर्चाचा उद्देश बंजारा व इतर गैर-आदिवासी समाजांना महाराष्ट्राच्या अनुसूचित जमाती (S.T.) यादीत समाविष्ट न करण्यासाठी राज्यपालांकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करणे होता.संतोष कोवे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली कारंजा येथील नागरिकांनी राज्यपालांना निवेदन दिले. त्यांनी म्हटले की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी स्वीकारण्यात आल्या, मात्र हे गॅझेट कालबाह्य झालेले आहे. भारत देशात नियम भारतीय संविधानानुसार चालतात आणि एका राज्यातील जमाती दुसऱ्या राज्यात अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट असेल, असे आवश्यक नाही.निवेदनात सांगण्यात आले की, कर्नाटकमध्ये मराठी मराठा, गुजरातमध्ये कुणवी, तेलंगाना व आंध्रप्रदेशात माळी या जमाती अनुसूचित जमाती यादीत समाविष्ट आहेत. मात्र महाराष्ट्रात बंजारा व इतर गैर-आदिवासी समाजाला समाविष्ट करण्याचा विचार केला गेला, तर आदिवासी समाजाचे अधिकार धोक्यात येऊ शकतात.निवेदनात महाराष्ट्र राज्यपालांना विनंती केली आहे की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, महाराष्ट्राच्या अनुसूचित जमाती यादीत बंजारा व इतर गैर-आदिवासी समाजांचा समावेश होऊ नये. जर सरकार राजकीय दबावाखाली असवैधानिक निर्णय घेत असेल, तर आदिवासी समाज आपल्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतो, असेही नमूद करण्यात आले.मोर्च्यात संतोष कोवे, कांचन चौधरी, शंकर मस्के, योगेश नीलगाम, दत्ता चिकराम, रेखा खंडावे, गजानन भावाड, सविता मडावी, कविता मडावी, मनोज घोंगडे, गणेश वाघमारे, नारायण कोकळे, गणेश सोनटक्के, रीना उईके, भीमराव अंभोरे, ज्ञानेश्वर गिरे, आदर्श जिरे यांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/ganpati-gaikwadsah-pach-jan-innocent-free/
