मुंबई: प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या मुद्यांवर सरकारवर हल्लाबलो केला.कडूंच्या म्हणण्यानुसार, “कर्ज घेणं हे चुकीचं नाही, पण कर्ज कशावर खर्च केला जातो हे महत्वाचं आहे. राज्य सरकार आता सांगत आहे की पैसे नाहीत, मात्र निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना तीन हफ्त्यांचे पैसे दिले आणि नंतर त्यांना अपात्र केले. पैशाअभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना बंद केली गेली. हा मदत कार्यक्रम नसून फक्त राजकीय वापरासाठी होता,” असे ते म्हणाले.
निवडणुकींवरही टीका
बच्चू कडू म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हे माहित नाही. सगळा नियंत्रण एका ठिकाणाहून चालवले जात आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालावा, ईव्हीएम देखील तिथे ठेवावी. जयकुमार गोरे यांना भाजपाचं डोकं आहे, आम्ही सामान्य लोकांचे डोके आहोत,” अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांसाठी आग्रह
“15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार,” असे कडू म्हणाले. त्यांनी देशातील उद्योगपत्यांचे मोठे कर्ज माफ करण्यात आले आहे, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोप केला.
कडू म्हणाले, “शेतकऱ्यांना 20% बोनस आणि GST परतावा द्यायला हवा होता, परंतु काहीही झाले नाही. अतिवृष्टी झाली तरी सरकार बोलायला तयार नाही. सोयाबीन 3,400 रुपयांना विक्रीसाठी निघणार आहे, पण सरकार काहीही करत नाही.”बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरात कॅम्पेनवरही टीका केली. “शिवाजी महाराजांचे महापुरुषत्व जातीजातीत वाटून टाकले जात आहे. आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी बोलणार आहोत,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उल्लेख
कडू म्हणाले, “सात महिन्यांत सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात 90% हिंदू शेतकरी आहेत. तुम्ही निवडणुकीच्या काळापुरते हिंदुत्व दाखवता का?”
रस्ते आणि प्रशासनावर टीका
कडू म्हणाले, “गावाकडचे रस्ते खराब आहेत, परंतु महामार्ग चांगले आहेत. अक्कलकोटमध्ये रुग्णवाहिका जात नाही म्हणून बैलगाडीतून रुग्णांना न्यावे लागत आहे. सरकारकडून ग्रामीण भागासाठी काहीच उपाय नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
