पुणे : ज्यांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत असे काही ‘भटकते आत्मे’ आहेत. आपला महाराष्ट्र देखील याचा शिकार झालाय. आजपासून ४५ वर्षांआधी या खेळाला सुरूवात केली. १९९५ मध्ये आलेल्या युतीच्या सरकारला हाच भटकता आत्मा अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. हा आत्मा फक्त विरोधकच नव्हे तर स्वतःचा पक्ष आणि आपल्या घरात पण असेच करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर असतानाच मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केल्याने बारामतीसह महाराष्ट्रात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेमुळे लोकसभा निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातील महायुतीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. पुण्यातील सभेला संबोधित करताना गेल्या १० वर्षातील विकासकामांची जंत्री सांगत मोदींनी विरोधकांनाही लक्ष्य केले. यावेळी त्यांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळविला.
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही
ज्यांची स्वप्ने पूर्ण झालेली नसतात, ते भटकते आत्मे दुसऱ्यांची स्वप्नेही पूर्ण होऊ देत नाही, त्यांच्यामध्ये खोडा घालण्याचे काम करतात. आजपासून ४५ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी इथल्या एका बड्या नेत्याने (शरद पवार) अस्थिरतेच्या खेळाला सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांना त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. केवळ विरोधकच नव्हे तर आपल्या पक्षात आणि कुटुंबालाही अस्थिर करण्याचे प्रयत्न आत्मा करत असतो, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता चढवला.
Related News
पवार कायम अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करतात
“शिवसेना भारतीय जनता पक्षाचे १९९५ साली राज्यात सरकार आले. परंतु काही दिवसांतच ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न या आत्म्याने सुरू केले. अगदी आत्ताही २०१९ साली राज्यातील जनतेच्या जनादेशाविरोधात जाऊन त्यांनी जनतेचा अपमान केला. सध्या केवळ महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून हे थांबत नाहीत देशात कशी अस्थिरता निर्माण होईल, याचा प्रयत्न ते करतात”, अशी टीकाही मोदी यांनी केली.