सिंदखेडराजा – तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी ढगफुटीने शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशीचे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून शेतं अक्षरशः जलमय झाली आहेत. शेतकरी हताश, निराश आणि संतप्त झाले असून शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश:
पळसखेड चक्का येथील शेतकरी बालाजी सोसे व पांडुरंग सोसे यांनी शासनाला थेट इशारा दिला – “शेतकऱ्याला न्याय द्यायचा की शेतकऱ्याचं रक्त पिणार? शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”
गेल्या तीन वर्षांपासून सतत ढगफुटी, अतिवृष्टी व गारपीटामुळे शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला असूनही शासनाकडून हवी ती मदत मिळत नाही. 2023 मध्ये नेतेमंडळींनी दौरे काढून आश्वासन दिले होते, परंतु शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान झाल्यानंतरही फक्त 79 टक्के मदत मंजूर करण्यात आली आणि अजूनही अनेकांना नुकसानभरपाईचे पैसे मिळालेले नाहीत.
चुकीची पावसाची नोंद – शेतकरी न्यायवंचित:
किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणेच्या चुकीच्या आकडेवारीमुळे खरी परिस्थिती शासनासमोर पोहोचत नाही. परिणामी मदतीचे गणितही चुकीचे ठरते आणि शेतकरी न्यायापासून वंचित राहतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
गंभीर परिस्थिती – पुराचा धोका:
सततच्या मुसळधार पावसामुळे पातळगंगा नदीला मोठा पूर आला असून उंब्रज–देशमुख या दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. किनगाव राजा शहरालाही पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शेतकरी योद्ध्यांचा लढा:
शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे हे गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात सातत्याने लढा देत आहेत. मात्र शासनाच्या कागदोपत्री आकडेवारीवर आधारित मदत धोरणामुळे शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहेत.
सरकारला थेट सवाल:
शेतकऱ्यांचा सरकारकडे सवाल आहे – “शेतकऱ्याला न्याय द्यायचा तर कुणाकडे मागायचा? मदत आणि आश्वासन हे फक्त कागदावरच राहणार आहेत का?”सिंदखेडराज्यातील या ढगफुटीने पुन्हा एकदा शेतकरी आणि शासनातील दरी स्पष्ट केली आहे. पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि शेतकऱ्यांची उद्विग्न स्थिती लक्षात घेता, शासनाने तातडीने प्रत्यक्ष मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच सर्वांची मागणी आहे.
read also : https://ajinkyabharat.com/putanya-krishnchi-comment-vahiral/