कारंजा (लाड): कारंजा शहरात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंती व अभियंता दिवसानिमित्त असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् आणि कारजा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रक्टर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल २०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, जे शहराच्या इतिहासातील एक विक्रम ठरला आहे.
शिबिराचे उद्घाटन आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात रक्तदान करणारे नागरिक राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान देत आहेत. यापूर्वी एका शिबिरात १७३ जणांनी रक्तदान केले होते, परंतु आजचा विक्रम त्या संख्येपेक्षा जास्त आहे.
या शिबिराला माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी, तहसीलदार कुणाल झाल्टे, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरचे अध्यक्ष डॉ. शार्दूल डोणगावकर, गो ग्रीन फाउंडेशनचे पद्माकर मिसाळ, गोरक्षण संस्थेचे सचिव आशिष ताबोळकर, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी संग्राम पाटील, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौरभ गुगलीया व आशिष डहाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय राऊत यांनी मानले. बडनेरा येथील संत गाडगेबाबा केंद्रातील टीमने रक्त संकलन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
बॉक्स:कारंजा शहरातील रक्तदान शिबिराने विक्रम मोडीत काढला; २०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आरोग्य सेवेत पुण्यकर्म केले. रक्तदान करणाऱ्यांची निष्ठा राष्ट्राप्रति आणि त्यांचा निःस्वार्थ हेतू गौरवनीय आहे. रक्तदानासाठी सरकारी व्यवस्थापन सुनिश्चित केल्यास गोरगरीब जनतेलाही याचा फायदा होईल.
read also :https://ajinkyabharat.com/sanjay-rautancha-serious-allegations/