धाराशिव : मराठवाड्यातील आंबेजवळगा, कौडगाव, येडशी, जवळा, दुधगाव, कसबे तडवळा, गोपाळवाडी, कोंबडवाडी – या ८ गावांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या विरोधात सातारा गॅझेट लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. ही मागणी प्रशासनासमोर मोठा पेच ठरली आहे.
या गावकऱ्यांनी सांगितले की, १९८२ पर्यंत हे ८ गाव सोलापूर जिल्ह्याचा भाग होते आणि त्यावेळचा प्रशासन सातारा गॅझेट वापरत होता. पण आता धाराशिव जिल्ह्याचा भाग झाल्यावर त्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्यात येत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्याची माहिती असली तरी सातारा गॅझेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अधिक माहिती सापडते. त्यामुळे कुणबी समाजाच्या नोंदी साठी सातारा गॅझेट अधिक योग्य ठरेल, असा त्यांचा ठाम दावा आहे.
ग्रामस्थांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याविषयी खुलासा करावा. प्रशासनाने लवकरात लवकर याविषयी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अन्यथा समाजात गैरसमज वाढण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
या मागणीत मोडी लिपीतील सर्व पुरावे कसबे तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान प्रशासनाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. परंतु या प्रकरणाचा योग्य तो मार्ग काढण्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि संबंधित विभाग यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
read also :https://ajinkyabharat.com/superstitious-legislation/