अकोला दंगा प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले
२०२३ मध्ये महाराष्ट्रातील अकोला शहरात झालेल्या धार्मिक दंगलीदरम्यान जखमी झालेल्या मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणास “एफआयआर नोंदवण्यासाठी योग्य” असल्याचे मान्य केले असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.ही याचिका अॅसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स (APCR) च्या मदतीने दाखल करण्यात आली होती. २३ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. वी. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली.
पोलिस तपासात हलगर्जीपणा
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, पोलिस तपासात गंभीर त्रुटी आढळल्या असून याचिकाकर्त्याचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवले गेले आहेत. मोहम्मद अफजल यांच्या आरोपानुसार, दंगलीदरम्यान त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली, तरीही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली नाही. हा प्रकार रुग्णालयात मेडिकल लीगल केस म्हणून नोंदवला गेला होता, मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
एफआयआर नोंदवण्याचा आदेश:
महाराष्ट्र पोलिसांनी याचिकाकर्त्याच्या तक्रारीची तात्काळ एफआयआर नोंदवावी.एसआयटीची स्थापना:
प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील वरिष्ठ पोलिस अधिकारी असतील.तीन महिन्यांत अहवाल:
नव्याने स्थापन केलेल्या एसआयटीने तीन महिन्यांच्या आत तपासाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा.पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई:
तपासात हलगर्जीपणा दाखवलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई केली जावी.
न्यायाची नवी आशा
या आदेशामुळे जखमी पीडित मोहम्मद अफजल यांना न्याय मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी नागपूर उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती कारण चार्जशीट दाखल होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, चार्जशीट दाखल असली तरीही निष्पक्ष चौकशीसाठी न्यायालय हस्तक्षेप करू शकते.
ज्येष्ठ वकिलांची युक्तिवादात सहभाग
याचिकाकर्त्यांची बाजू ज्येष्ठ वकील अभय ठिपसे, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड फौजिया शकील, तसेच अॅडव्होकेट शोएब इनामदार आणि मोहम्मद हुजैफा यांनी मांडली.
read also : https://ajinkyabharat.com/teacher/