अकोल्याचे सर्पमित्र: ५८ दिवसाची जिद्द

५८ दिवस

अकोल्याचे सर्पमित्र: ५८ दिवसाची जिद्द, धामण सापाच्या १२ पिल्लांना नवजीवन

अकोला – निसर्गातील प्राणीमात्रांचे रक्षण करण्यासाठी सर्पमित्र आपल्या जीवाचीही बाजी लावतात, पण अकोल्यातील एमएच-३० सर्पमित्र ग्रुपचे सुरज इंगळे व अभय निंबाळकर यांनी ५८ दिवस अखंड मेहनत करून धामण सापाच्या अंड्यांतून १२ पिल्लांना नवजीवन दिले.१२ जुलै रोजी खामगाव रोडवरील एका कार शोरूममध्ये धामण जातीचा बिनविषारी साप आढळला. सुरज इंगळे घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षित पकडला. मात्र, साप पिशवीत तब्बल १२ अंडी वाहून घेऊन आला होता, ज्याने इंगळे आणि त्यांच्या टीमला चकित केले.सापाला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर या अंड्यांना कृत्रिमरीत्या उबवण्याची जबाबदारी अभय निंबाळकर यांनी घेतली. त्यांनी अंडी डब्यात ठेवून लाकडी भुसा टाकला, ऑक्सिजनसाठी छिद्रे केले आणि सातत्याने उबदार तापमान राखले. सलग ५८ दिवस त्यांनी ही काळजी घेतली आणि अखेर सर्व १२ अंड्यांतून निरोगी धामण पिल्ले बाहेर आली.सुरज इंगळे व अभय निंबाळकर यांनी सांगितले, “कार शोरूममध्ये पकडलेल्या सापाने पिशवीत अंडी दिली. ती वाया जाऊ नये म्हणून आम्ही कृत्रिमरीत्या उबवली. सर्व पिल्ले सुखरूप बाहेर आल्याने आम्हाला अत्यंत समाधान मिळाले.”ही घटना फक्त सर्पमित्रांच्या जिद्दीचे प्रतीक नाही, तर समाजाला संदेश देते की बिनविषारी सापांचा नाश करण्याऐवजी त्यांचे संवर्धन आवश्यक आहे. अकोल्यातील या दोन सर्पमित्रांनी दाखवून दिले की खरी जिद्द असेल तर निसर्गालाही नवा श्वास देता येतो.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/beed-crime-maji-upasarpanch-govind-burge-meritage/