अकोट : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार अकोट तालुक्यात शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.या उपक्रमाचा भाग म्हणून ९ सप्टेंबर रोजी सोनबर्डी, मुंडगाव, कासोद, शिवपुर, राजूरवाडी व आगासखेड येथे शिवार फेऱ्या आयोजित करण्यात आल्या. कासोद–शिवपुर येथे नकाशावर असलेले, अतिक्रमणित तसेच चालू शेतरस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.या फेरीसाठी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. एकूण १६ शेतरस्त्यांची पाहणी करण्यात आली.राजूरवाडी व आगासखेड येथे दुपारी फेरी घेऊन गावातील शेतरस्त्यांची माहिती गोळा करण्यात आली तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ई-पिक पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला गेला.या मोहिमेत शिवार पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, सीमांकन आणि नोंदी पूर्ण करण्याची कामे केली जाणार आहेत. प्राथमिक टप्प्यात जिल्ह्यातील ५२ गावे निवडली असून २४८ रस्त्यांना संकेतांक देऊन सीमांकन पूर्ण करण्यात येणार आहे.याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) आयोजित ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमातही या अभियानाचा समावेश करण्यात आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/bharatacha-akashtail-vijay-jagatil-sarvanta-vegane-vadhanara-prost-jet-market/#