रिसोड येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी;

मानवतेचा संदेश घेऊन ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरा”

रिसोड: जगाला मानवतेचा संदेश देणारे, दया, क्षमा, संयम आणि सहनशीलतेचा मार्ग दाखवणारे इस्लाम धर्माचे पैगंबर हज़रत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही रिसोड शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावर्षी ईद-ए-मिलादुन्नबी व गणेश उत्सव एकत्रीत आल्यामुळे मिरवणूक आधी गणेश विसर्जनानंतर काढण्यात आली. सकाळी १० वाजता मुस्लिम बांधव शहरातील चांदणी चौक, जुनी सराफा लाइन, गुलबावडी, बेंदरवाडी, ब्राह्मण गल्ली, अष्टभुजा देवी चौक, जामा मस्जिद चौक, आसन गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉक्टर आंबेडकर चौक या मार्गाने धार्मिक गीते, झेंडे व पैगंबर मोहम्मद साहेबांच्या कार्याची माहिती देत मिरवणूक काढली.मिरवणूक पठाणपुरा मस्जिद समोरील मैदानात दुपारी ४ वाजता संपन्न झाली. मुस्लिम बांधवांनी आपल्या वरिष्ठ सदस्य व मुलांबरोबर आनंदोत्सव साजरा केला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मिरवणूक संपल्यानंतर शहरातील काही भागात जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.याव्यतिरिक्त, डॉक्टर आंबेडकर चौक येथे जुलूस कमिटी मोमीनपुराच्या वतीने राजकीय, शासकीय आणि सामाजिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, मुख्याधिकारी सतीश शेवदा, ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचा समावेश होता. सत्कारात शहरातील शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारही उपस्थित होते.उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने मुल्ला गल्ली जामा मस्जिद समोर भेट देऊन कार्यक्रमाचे निरीक्षण केले.

read also : https://ajinkyabharat.com/self-employment/