अकोला पोलिसांच्या मोक्का कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ,

अकोला पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांची जबाबदारीपूर्ण कारवाई

अकोला:अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या कडाक्याने घेतलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील कृषी नगर भागात दोन गटात झालेल्या हिंसक भांडणाच्या प्रकरणी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCCA/मोक्का) अंतर्गत १७ गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही वर्षातील मोक्काची पहिली मोठी कारवाई ठरली आहे.

सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या कार्यवाहीतून उघडकीस आले आहे की, कृषीनगर परिसरात जुन्या वादाच्या भरात एका टोळीतील आरोपींनी तलवारी, लोखंडी पाईप, कु-हाड, फरशी आणि अग्निशस्त्राचा वापर करून दुसऱ्या गटातील महिला व पुरुषांवर जीव मारण्याचा धाडसी हल्ला केला. या प्रकरणी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत टोळी प्रमुख शुभम विजय हिवाळे यांसह एकूण १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या आरोपींचे मागील दहा वर्षांचे गुन्हे दाखल केलेले अभिलेख तपासले असता त्यांच्यावर साधी व गंभीर दुखापत, घातक शस्त्रांनी हल्ले, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीर जमाव, शस्त्रसज्ज दंगा, अश्लील शिवीगाळ तसेच बेकायदेशीररीत्या शस्त्र व अग्निशस्त्रे बाळगण्याचे गुन्हे उघड झाले आहेत.

सध्या बहुतेक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून विविध प्रकरणांत दोषारोपपत्रही दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी स्पष्ट केला की, “अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अशा गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करण्याचा आमचा निर्धार आहे.”

read also :https://ajinkyabharat.com/peak-vima-na-mileli-shetkayanasathi-mahatwachi-meeting/