कारंजा (लाड):प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस, ईद-ए-मिलादुन्नबी, ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. गणेश विसर्जनामुळे यंदा हा उत्सव ८ सप्टेंबर २०२५ रोजी कारंजा शहरात भव्य मिरवणूक स्वरूपात साजरा करण्यात आला. शेकडो मुस्लिम भाविकांनी पारंपरिक वेशभूषा, हिरव्या पताकांनी सजलेल्या गाड्या आणि शुभेच्छा फलक घेऊन श्रद्धेने सहभागीता घेतली.
सकाळी ८.३० वाजता स्थानिक जामा मस्जिद पासून सुरुवात झालेल्या मिरवणुकीत भक्तिमय वातावरण प्रस्थापित करण्यात आले. मिरवणूक सराफा लाईन, मेन रोड, दिल्ली वेश, इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक, स्टोर लाईन, टिळक चौक, अमर चौक, दरोगा मस्जिद चौक, भाजी बाजार, जिजामाता चौक, अस्ताना, पोलिस स्टेशन, नगर परिषद, जे.सी.हायस्कूल, चवरे लाईन, जे.डी.हायस्कूल, बीबी साहबपुरा, काझीपुरा, महात्मा फुले चौक, जुना सरकारी दवाखाना, नगीना मस्जिद, सराफा बाजार मार्गे परत जामा मस्जिद येथे फातेहाखाणीने समारोप करण्यात आला.
जामा मस्जिदचे मौलाना अ. मजीद साहब, नगिना मस्जिदचे इमाम सय्यद अहमद, काजी मो. इकबाल, हाजी युसुफ पुंजानी, तसेच हजारो मुस्लिम बांधवांनी सहभागी होऊन शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला. सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पाण्याची आणि अल्पोहराची सोय करण्यात आली होती.
विशेषतः, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांनी ५ क्विंटल शाकाहारी पुलावाचे वाटप केले. स्थानिक पुंजानी कॉम्प्लेक्स येथे आयोजित जेवणात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आणि यामुळे मिरवणूक सामाजिक एकात्मतेचा प्रतिक बनली.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी देशमुख व शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी चोख बंदोबस्त ठेवून संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली.
ही मिरवणूक केवळ धार्मिक उत्सव नाही तर मानवतेचा संदेश देणारी एक प्रभावी घटना बनली असून, प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शिकवणीचा प्रसार समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात होण्याचा प्रयत्न करण्यात आला.
read also :https://ajinkyabharat.com/manabha-yehthe-devotional-atmosphere-ganesh-visarjan-sohna/