भाईंदर – मीरा-भाईंदरमध्ये बजरंग नगर येथील एका कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले. या घटनेत तीन वर्षांच्या दिपाली मोर्याचा मृत्यू झाला असून, इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
माहितीनुसार, मुलीचे वडील रविवारी संध्याकाळी बाजारातून चिकन आणले होते. ते चिकन घरी शिजवून संपूर्ण कुटुंबाने रात्री जेवणात घेतले. जेवल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील महिला, तीन मुली (वय 3, 6, 8 वर्षे) आणि मेहुण्या उलटी, जुलाब व तीव्र पोटदुखीने त्रस्त झाले.
रमेश मोर्या, नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्यावर मीरा-भाईंदर येथील डॉ. भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी सांगितले की, चिमुकलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण विषबाधा असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्नातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट नसल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे.
पोलीस आणि प्रशासनाने परिसरातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/encroachment-2/