बातमी:पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे पंजाब राज्यात भीषण संकट निर्माण झाले आहे. रावी, सतलज आणि चिनाब नद्यांच्या पुराने 4100 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरले असून 56 लोकांचा मृत्यू झाल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. अंदाजे 4 कोटी लोकसंख्येवर या पुराचा मोठा परिणाम झाला आहे.
पुरामुळे प्रभावित जिल्ह्यांमध्ये बेघर झालेल्या नागरिकांना तात्पुरत्या मदत छावण्या आणि तंबू नगरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, आतापर्यंत 425 मदत छावण्या स्थापन करण्यात आल्या असून नागरिकांना अन्न व निवारा पुरवण्यात येत आहे.
500 हून अधिक वैद्यकीय छावण्यांमध्ये सुमारे 1,75,000 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जखमी, संसर्गजन्य आजारांनी त्रस्त लोकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 2 कोटीहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. तसेच 1.5 कोटीहून अधिक जनावरेही सुरक्षित भागात हलवण्यात आली आहेत.
जिल्हा प्रशासन Multhan मध्ये हेड त्रिमू परिसरातून येणाऱ्या संभाव्य पूराच्या लाटेला तोंड देण्यासाठी सशक्त कार्ययोजना राबवत आहे. चिनाब नदीवरील हेड मुहम्मदवाला आणि शेरशाह पूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने संरक्षणात्मक उपाय यशस्वी होत आहेत. मात्र, नवीन पावसाच्या लाटेमुळे पुन्हा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)च्या मते, जून महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे व पूरामुळे देशभरात 900 हून अधिक लोकांचा बळी गेला असून 1,000 हून अधिक जखमी झाले आहेत.
या परिस्थितीमुळे पंजाबमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सध्या युद्धपातळीवर कार्यरत असून, नागरिकांचे जीव व माल सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.