बीड –बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक भाषण देत राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयाचा (GR) विरोध केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय काढला होता. मात्र या निर्णयाला ओबीसी समाजकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर भोगलवाडी मेळाव्यात विरोधाचा सूर फुंकण्यात आला.
नवनाथ वाघमारेंचे आक्रमक वक्तव्य
नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. “मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओखण्याचे काम करतोय,” असे त्यांनी ठळकपणे म्हटले. तसेच त्यांनी पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ठरवलं असतं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंखे देखील पराभूत झाले असते.
वाघमारे यांनी हे देखील स्पष्ट केले की, ओबीसी समाजाच्या हितासाठी आता रस्त्यावरच लढा द्यावा लागणार आहे. निजामच्या अवलादींना ओबीसी आरक्षणात स्थान देण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडणार आहोत.
चंदनचोराला खासदार घोषित केल्याचा आरोप
नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधला. “चंदनचोर खासदार का बनला? ओबीसींनी चुकीने त्याला परत निवडून दिले,” असे ते म्हणाले. त्याचबरोबर “ओबीसींच्या परिपत्रकाला विरोध न करता शांत बसायचे नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
मराठा समाजाविरोधात तीव्र आरोप
नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजावरही तीव्र टीका केली. “15 टक्क्याही मराठा समाजाचा प्रदेशात नसताना, ते राज्याला वेठीस धरतात,” असं ते म्हणाले. तसेच “घाणेरडे लोक मराठा असू शकत नाहीत,” असा कटाक्षही त्यांनी केला.
वाघमारे यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींसाठी 56 हजार जागा मिळवून देण्यात याव्यात. शासनाने काढलेल्या परिपत्रकाला रद्द केल्याशिवाय शांत बसायचं नाही, असे त्यांनी उपस्थितांनाही आवाहन केले.
भोगलवाडी मेळावा ओबीसी समाजाच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक ठरत आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांसारख्या आक्रमक नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला ठोसपणे विरोध केला असून आता पुढे काय काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वातावरण तापले असून, मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
read also :https://ajinkyabharat.com/sarkarchaya-maratha-reservation-navya-navya-grvath-chhagan-bhujbala/