बार्शिटाकळी : येथील गणेश विसर्जन सोहळा रविवारी (७ सप्टेंबर २०२५) उत्साहात सुरु झाला असता, परंतु काळ्या मारोती चौकाजवळ जुम्मा मस्जिद समोर दुपारी सुमारे १.३० वाजता पोलीस व गणेश मंडळ कार्यकर्त्यांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला. या विसंवादामुळे विसर्जन मिरवणूक तब्बल तीन तास थांबवावी लागली.स्थानिक पोलीस ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी या घटनेविषयी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे स्पष्ट झाले. मात्र, मुर्तीजापुर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने प्रकरण शांत करण्यात आले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी व गणेश मंडळ कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा सुसंवाद साधला गेला आणि सायंकाळी ४ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.एकूण १८ गणेश मंडळांनी भाग घेतलेल्या या विसर्जन मिरवणुकीत, सकाळी ८.३० वाजता सोमवार पेठ, भोईपुरा, ढोरे वेटाळ, माळीपुरा चौक व मस्जिद समोरून मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु, काळ्या मारोती चौकात पोलीस व गणेश मंडळ कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी पोलीसांकडून माफी मागितली नाही तर मिरवणूक पुढे जाणार नाही, अशी अट घातली होती.घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, भाजपाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे व त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांशी समजूत घालून मिरवणुकीला पुन्हा सुरुवात करुन दिली. त्यानंतर अतिरीक्त पोलीस अधिक्षक रेड्डी घटनास्थळी पोहोचले.मिरवणुकीत गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते, अतिरीक्त पोलीस अधिक्षक रेड्डी, विभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, तहसिलदार राजेश वझीरे, ठाणेदार प्रविण धुमाळ, नायब तहसिलदार अतुल सोनोने, श्रीराम येळवणकार, मासुनखान, अनंत केदारे, मदन धात्रक, रमेश वाटमारे, मेहफुज खान, प्रविन धाईत, दत्ता साबळे, भास्कर ग्याने व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. हिंदू-मुस्लिम बौद्ध बांधवांनीही शांततेचे वातावरण राखले.दरम्यान, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे इंचार्ज प्रवीण धुमाळ आणि बीट जमादार ईश्वर पातोंड यांच्याशी आमच्या तालुका प्रतिनिधीने अनेक वेळा फोनवर संपर्क साधला, परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी चांगल्या पद्धतीने मध्यस्थी करून प्रकरण शांत केले, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.ही घटना सामाजिक सहअस्तित्व व शांततेच्या महत्त्वाची उदाहरण ठरली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pakistancha-nava-cut-ujhad/