आलेगाव: मानवसेवा आणि सामाजिक योगदानाचा संदेश पसरविण्यासाठी आलेगाव येथील युथ नौजवानाए मिल्लत यांच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बस स्टॅंड आलेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जवळपास 92 युवकांनी रक्तदान करून समाजात मानवतेचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जामा मस्जिदचे इमाम हाफिज जुबेर खान यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनातील मानवसेवा आणि जागतिक शांतिचा संदेश सांगितला. तसेच हाफिज अवैस यांनी पैगंबरांच्या जीवनकार्य प्रणाली आणि मानवसेवेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. हाफिज जुबेर यांनी स्पष्ट केले की आजच्या युगात रक्तदान हे मानवतेसाठी अत्यंत महत्वाचे असून, पैगंबरांच्या जयंती दिवशी रक्तदान करणे हा त्यांच्या शिकवणीचा सर्वोत्तम प्रत्यय आहे.कार्यक्रमाचे संचालन हाफिज खान यांनी केले, तर आभार नोमान बेग यांनी मानले. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मो. शारीक, अब्दुल जफर, सैय्यद मजहर, मो. राजीक, सैय्यद अबजल, नय्युम बेग, सै. याकुब, आसिफ मिरजा, नदीम यांसह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात आलेल्या ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला, तर उपस्थित युवक बांधवांनी मानवसेवेचा संदेश प्रसारित करत समाजातील युवकांना प्रेरणा दिली. यामुळे मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन समाजात आपली जबाबदारी ओळखण्याची संधी निर्माण झाली.आलेगाव येथील या रक्तदान शिबिरामुळे जयंतीनिमित्त सामाजिक सेवा आणि मानवतेचा संदेश प्रचंड प्रमाणात पसरला, तर युवकांमध्ये सामुदायिक जबाबदारीची जाणीव वाढली.
आलेगाव येथे मो पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर; 92 युवकांनी दिला जीवनदान

07
Sep