कामरगाव: गणेशोत्सवातील अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात उत्साहात पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काही ठिकाणी ध्वनीमर्यादा ओलांडल्यामुळे धनज पोलिसांनी कठोर कारवाई केली.कामठा, टाकळी आणि विळेगाव येथील विसर्जन मिरवणुकांदरम्यान नियमबाह्य पद्धतीने वाजवण्यात आलेले पाच डी.जे. सेट्स जप्त करून कामरगाव चौकीत आणण्यात आले. या डी.जे. सेट्स पेडगाव, कारंजा, कारखेडा आणि पिंपळगाव (जि. यवतमाळ) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.धनज पोलिसांच्या पथकाने ग्रामिण भागातील काही ठिकाणी अनधिकृतरित्या सुरू असलेले डी.जे. बंद करून त्यावर दंडात्मक कारवाई केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीमर्यादा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असल्याने, नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे पोलिसांनी थेट हस्तक्षेप केला.पोलिसांच्या या कारवाईमुळे काही वेळेस गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले, तरी पुढील मिरवणुका शांततेत पार पडल्या. प्रशासनाचे आवाहन आहे की, गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व भक्तीगीतांच्या सुरावटींमध्ये शांततेत पार पाडाव्यात.धनज पोलिसांच्या म्हणण्यानुसार, येत्या काळात कोणत्याही धार्मिक वा सामाजिक उत्सवांदरम्यान ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी परंपरांचा सन्मान राखत, नियमांचे पालन करावे, असे पोलिस प्रशासनाचे आवाहन आहे.पुढील कारवाई ठाणेदार भारत लसंते यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव पोलीस चौकी इन्चार्ज गणेश शिंदे व सहकारी करत आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/ganesh-visarjan-mirvanukit-vijichya-dhakkhyane-tarunacha-mari-5-jan-jakhmi/