मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोटीत पती प्रदीप खरेरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावला. प्रदीप आपल्या पत्नी विशाखासह रिक्षाने प्रवास करत असताना एका ओला कारने त्यांच्या रिक्षेला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप आणि त्याची पत्नी किरकोळ जखमी झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. प्रदीपने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत सर्वांना अपघाताची सविस्तर माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, “ओला कार चालक दारूच्या नशेत होता. त्याला पकडल्यावर तो म्हणत होता, गाडी चालवायला शिकत होतो. मात्र त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता आणि तो नीट उभाही राहू शकत नव्हता.”
या धडकेत रिक्षाचालक, जे वयाच्या सुमारे 70 वर्षांचे असल्याचे प्रदीपने सांगितले, गंभीर जखमी झाले. “काका एवढ्या वयात कष्टाने रिक्षा चालवत होते. धडकेनंतर ते रडत होते. तुमच्या दारूच्या नादामुळे एखाद्या चांगल्या माणसाचा जीव गमवावा लागला असता,” असे प्रदीपने भावनिक शब्दांत म्हटले.
त्याने नागरिकांना आवाहन केले की, “दारू प्यायची असेल तर घरी थांबा, पण दारू पिऊन वाहन चालवू नका. कारण तुमच्या एका चुकीमुळे निर्दोषांचे प्राण धोक्यात येऊ शकतात.”
READ ALSO : https://ajinkyabharat.com/manoj-jarangena-stuck-karani-magani-chief-minister/