आरक्षणाचा जीआर फाडल्याचा आरोप; समाजात तणाव निर्माण होण्याची भीती

आरक्षणाचा

खामगाव – आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य केल्याचा आरोप करत प्रा. लक्ष्मण हाके (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार स्थानिक पत्रकार व डिजिटल मिडिया संपादक श्रीधर ढगे यांनी दिली.तक्रारीत म्हटले आहे की, प्रा. हाके यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासन निर्णय (जीआर) परिषदे दरम्यान फाडून शासनाचा अवमान केला. यामुळे समाजात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून ओबीसी व मराठा समाजात वैमनस्य निर्माण होऊ शकते, असा ठपका ठेवण्यात आला आहे.ढगे यांनी पुढे म्हटले की, “शासनाचा अधिकृत आदेश हातात असूनही त्याचा विपर्यास करून तेढ पेरण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रा. हाके यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून तातडीने अटक व्हावी.”या तक्रारीत भादंवि कलम १५३, १५३-अ, ५०५, ५०५(२) व १८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर तक्रार खामगाव शहर पोलिस ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्याकडे दाखल झाली असून प्रतिलिपी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, मंत्री आ. आकाश फुंडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न आधीच तापलेला असताना प्रा. हाके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्थानिकांमध्ये चर्चेला ऊत आला आहे. समाजात तणाव वाढू नये यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/amhala-teacher/