मुंबई :मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट संदर्भातला शासन निर्णय (जीआर) सरकारलाच महागात पडणार असल्याची टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.शेंडगे म्हणाले, “हा निर्णय केवळ ओबीसीचाच नव्हे तर सर्वच मागासवर्गीय समाजांचा आरक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा आहे. जर सरकारने मराठ्यांसाठी जीआर काढला, तर पुढे बंजारा, धनगर आणि इतर समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करतील. तेव्हा सरकार त्यांना काय उत्तर देणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.सरकारने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला घाबरून जीआर काढला असल्याचा आरोप करताना शेंडगे यांनी म्हटलं, “बस जाळली, महाराष्ट्र बंद केला म्हणून आरक्षण द्यायचं असं नसतं. धमक्यांना सरकारने किती भीक घालायची?” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबन तायवाडे यांच्या उपोषणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तायवाडेंनी उपोषण का सोडलं? त्यांची १२ मागण्या मान्य झाल्या का? शासन निर्णय कुठे आहे? जरांगेप्रमाणे त्यांनीही सरकारला अडचणीत आणायला हवं होतं,” अशी टीका शेंडगे यांनी केली.छगन भुजबळ यांची भूमिका किंवा बबन तायवाडे यांचं आंदोलन याला महत्त्व नाही, तर समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/bharatchaya-shejaril-desacha-motha-decision/