मुंबई :मराठा समाजासाठी आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज एक धडाकेबाज विधान करत पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे. “आम्ही ओबीसीत गेलो नाही, तर ओबीसी आमच्यात आलाय,” असा दावा त्यांनी केला आहे.मराठा आरक्षणासाठी मुंबईत केलेल्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढला. मात्र या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे, तर सरकारनेही या विषयावर अभ्यासासाठी उपसमिती नेमली आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, “आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे. मराठे पूर्वीपासूनच आरक्षणात होते. 1881 पासून आम्ही या हक्काचा भाग आहोत. माझ्या लेकरांनी करोडोंनी मुंबईत येऊन विजय मिळवला. आता त्याला शासनाने मान्यता दिली आहे. आम्ही ओबीसीत शिरलो नाही, तर ओबीसी आमच्यात आलाय. आमचे मन आणि परंपरा मोठी आहेत. समाजाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर आरक्षण आवश्यक आहे.”त्यांनी छगन भुजबळांवरही टीका केली. “भुजबळांना जीआर चांगला कळतो. त्यांनी मोठे पक्ष, सत्ता, कॅबिनेट हाताळली आहे. त्यांना या विषयाचा पुरेसा अभ्यास आहे,” असे ते म्हणाले.सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी असून, त्यांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र जरांगे यांच्या या विधानामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आम्ही ओबीसीत गेलो नाही, ओबीसी आमच्यात आलाय

05
Sep