काबूल : अफगाणिस्तान पुन्हा एकदा प्रचंड भूकंपाने हादरला आहे.
रविवारी उशिरा रात्री पूर्वेकडील नांगरहार प्रांताजवळ ६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला.
या हादऱ्यांमध्ये आतापर्यंत ८०० लोकांचा मृत्यू झाला असून,
तब्बल २,५०० लोक जखमी झाले आहेत.
अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून ढिगाऱ्याखाली शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ढिगाऱ्याखाली शोध सुरू
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, हा भूकंप रात्री ११:४७ वाजता झाला.
केंद्रबिंदू जलालाबादपासून २७ किलोमीटर अंतरावर होता.
भूकंप केवळ आठ किलोमीटर खोलीवर झाल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला.
कुणार आणि नुरिस्तान प्रांतात घरे कोसळली असून,
ढिगाऱ्याखाली नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अनेक वस्त्यांमध्ये अद्याप संपर्क साधता आला नाही.
त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
पाकिस्तान सीमेवरील भागातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.
रुग्णालयांमध्ये शेकडो जखमींवर उपचार सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय मदतीची गरज
माजी महापौर झरिफा घफ्फारी यांनी सोशल मीडियावर लिहिले की,
“कुनर, नांगरहार आणि नुरिस्तान प्रांतांमध्ये संपूर्ण गावे नष्ट झाली आहेत.
महिला, मुले आणि वृद्ध भीषण संकटात आहेत. तालिबान सरकारकडून योग्य मदत मिळत नाही,
त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मदतीसाठी पुढे यावे.”
गेल्या वर्षीही अफगाणिस्तानात भीषण भूकंप होऊन १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.
हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे प्रमाण वारंवार दिसून येते.
Read also : https://ajinkyabharat.com/mumbai-2/