मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकऱ्यांवर
निसर्ग संकटानंतर आता रानडुकरांच्या उपद्रवाचे सावट आले आहे.
संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर
रानडुकरांनी आक्रमण करत मोठी नासाडी केली.
यामुळे रोकडे यांना आर्थिक फटका बसला असून, परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.
रात्रीच्या सुमारास रानडुकरांचा कळप शेतात घुसून उभे पीक
उद्ध्वस्त करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे.
आधी अतिवृष्टी, नंतर हुमनी अळीचा प्रादुर्भाव आणि
आता रानडुकरांचा उपद्रव – अशा सलग संकटांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शेतकरी संतोष रोकडे म्हणाले,
“आम्ही दिवसरात्र मेहनत करून पिक उभं करतो.
पण रानडुकरं काही तासांत सगळं उध्वस्त करून टाकतात.
आता शेती वाचवण्यासाठी रात्री गस्त घालावी लागते.”
रानडुकरांच्या उपद्रवामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी,
अशी मागणी पुढे येत आहे. त्याचबरोबर वनविभागाने तातडीने रानडुकरांचा बंदोबस्त करावा,
अशीही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या मागण्या :
रानडुकरांवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी
शेतीचे संरक्षण करण्यासाठी सवलतीच्या दरात कुंपण पुरवावे
वनविभागाने योग्य उपाययोजना न केल्यास रानडुकरांचा
त्रास आणखी वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.