कारंजा (लाड) : तालुक्यातील इमामपूर–खतनापुर शिवाराकडे
जाणाऱ्या पांदन रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे.
शेतकरी दररोज जीव मुठीत धरून शेतात ये–जा
करत असून अपघाताची शक्यता कायम आहे.
ट्रॅक्टर, बैलगाड्या, दुचाकी वा चारचाकी वाहनांसाठी
या रस्त्याने जाणे म्हणजे जणू संकटाचा प्रवास ठरत आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील
अनेक वर्षांपासून निवेदनांचा पाढा वाचला जात आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयात वारंवार धाव घेतली,
लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, तरीही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
शेतमाल वाहतुकीसह शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते चांद भाई मुन्नीवाले यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
“शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून शासन व प्रशासन जबाबदारी झटकत आहे,”
असा आरोप त्यांनी केला.
ग्रामीण भागातील शेतकरी हा देशाचा कणा असतानाही
त्यांच्यासाठीचा महत्त्वाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात
येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
तातडीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
शेतकरी वर्गाकडून देण्यात आला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/americanchya-turiff-anmbajavanantrahi-ongcch-moth-state/