रशियन तेल खरेदीवर ठाम!
नवी दिल्ली – अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ)
लादलं असलं तरी, रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा प्रश्नच नाही,
असं स्पष्ट वक्तव्य ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)
चेअरमन अरुणकुमार सिंह यांनी केलं.
“जोपर्यंत व्यापारी दृष्ट्या ते योग्य आहे,
तोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहील,”
असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम
अमेरिकेनं २७ ऑगस्टपासून भारताच्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लागू केलं आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला हे शुल्क २५ टक्क्यांवर होतं,
मात्र त्यात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
हे टॅरिफ भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे लादल्याचं समजतं.
ओएनजीसीचे २१ प्रकल्प सुरु
ओएनजीसीच्या दोन युनिट्स – हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
आणि मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (MRPL)
– त्यांच्या रिफायनरीसाठी नियमितपणे रशियाकडून तेल आयात करत आहेत.
सध्या कंपनीचे २१ प्रकल्प सुरु असून त्यावर तब्बल ६६ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे.
यामध्ये ९ विकास प्रकल्प आहेत, तर उर्वरित इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत.
जागतिक स्तरावर गुंतवणुकीचा शोध
ओएनजीसीचे विदेश व्यवस्थापकीय संचालक राजर्षी गुप्ता यांनी सांगितलं की कंपनी
अमेरिकेसह लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम
आशियामध्ये एलएनजी व तेल-गॅस प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे.
सध्या रशियात ओएनजीसीचे तीन प्रकल्प सुरु असून इतर भौगोलिक क्षेत्रांचा विचार सुरु आहे.
रशियाकडून खरेदीत मोठी वाढ
रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताची रशियाकडून तेल खरेदी झपाट्याने वाढली आहे.
२०१८ मध्ये भारत फक्त १.३% तेल रशियाकडून घेत होता.
मात्र २०२४-२५ मध्ये ही खरेदी तब्बल ३५% पर्यंत पोहोचली आहे.
चीननंतर भारत हा रशियाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश ठरला आहे.
अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारत- अमेरिका व्यापार संबंधांवर
काय परिणाम होणार आणि रशियाकडून सुरू असलेल्या तेल
खरेदीवर पुढे काही बंधने येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/shindenni-dile-aaple-aircraft-home-minister-society-leaves-for-gujaratla/