मुंबई – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यात जनआंदोलन उसळले असून,
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले असून,
विविध नेते, खासदार-आमदारही समर्थन दर्शवत आहेत.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे
भाजप आमदार समाधान आवताडे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट भूमिका घेतली आहे.
त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे,
अशी मागणी केली आहे.
आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की,
“गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,
ही सकल समाजाची तीव्र मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याबाबत तातडीने तोडगा
काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवणे आवश्यक आहे.”
आंदोलनस्थळी जनसागर
आज सकाळपासूनच मुंबई सीएसटी स्थानक आणि
आझाद मैदान परिसरात मराठा बांधवांची प्रचंड गर्दी उसळली होती.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ५ हजार आंदोलकांची
मर्यादा असतानाही हजारो मराठा बांधव मैदानात व परिसरात जमल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली.
नेत्यांचा पाठिंबा
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बीड,
धाराशिव आणि इतर जिल्ह्यांतील खासदार-आमदारांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक
लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन दिलं.
दरम्यान, पोलिसांकडून आंदोलनाला आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/mahavitranchaya-vidyut-safety-campaign/