मैराळडोह – वाशिम जिल्ह्यातील मैराळडोह गावात तब्बल १६२२ पासून वाड्यातील गणपती बाप्पाची परंपरा आजही अखंडित सुरू आहे.
दौलतराव घुगे हे चित्तौडवरून आपल्या कुटुंबासह येथे स्थायिक झाले
तेव्हा त्यांनी वाड्यात दोन फूट उंच मातीची मूर्ती प्रस्थापित केली.
आज या मूर्तीला ४०० हून अधिक वर्षांचा इतिहास लाभला आहे.
या गणपती बाप्पांची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मूर्तीचे विसर्जन होत नाही.
अनंत चतुर्दशीला गावात मिरवणूक काढली जाते;
मात्र मूर्ती पुन्हा मंदिरातील गाभाऱ्यात प्रतिष्ठापित केली जाते.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी ही परंपरा शतकानुशतकं जपली गेली आहे.
नागपंचमीपासून पोथीचे अखंड पारायण सुरू होते,
तर उत्सवाच्या अखेरच्या तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
गावातील सुमारे ३५ घुगे कुटुंबांसह सर्व गावकरी एकदिलाने हा उत्सव साजरा करतात.
कोणताही ट्रस्ट, वर्गणी किंवा शासनाचा निधी नसून फक्त भक्तिभावावर हा सोहळा पार पडतो.
श्रद्धाळू पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येतात,
अनेक जण आपल्या मनोकामना बाप्पापुढे व्यक्त करतात.
स्थानिक राजकारणीही प्रचारारंभी येथे नारळ फोडून आशिर्वाद घेतात.
आजच्या पॉपच्या मूर्तींच्या युगात ४०० वर्षांपूर्वीची मातीची मूर्ती हे खऱ्या अर्थाने
पर्यावरणपूरकतेचे अनोखे उदाहरण ठरते. शिस्त, सोज्वळपणा आणि
भक्तीभाव यामुळे मैराळडोहचा गणेशोत्सव जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातीलही एक वेगळेपण जपणारा ठरतो.