कुणाल राठोड ठरला ‘एक दिवसीय सरपंच’
मानोरा – गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे,
त्यांच्यात स्पर्धात्मकता वाढावी यासाठी कारखेडा ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक
गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला “एक दिवसीय सरपंच” म्हणून पदभार देऊन सन्मानित करण्यात येते.
याच परंपरेत यावर्षी इयत्ता बारावीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा कुणाल किशोर राठोड
याला २८ ऑगस्ट रोजी ‘एक दिवसीय सरपंच’ म्हणून पदभार सोपविण्यात आला.
ग्रामपंचायतीचे पारदर्शक कामकाज, प्रशासनाची माहिती,
गाव विकासाच्या योजना यांचा आढावा घेण्याची संधी कुणालला मिळाली.
या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात येतो.
त्यानुसार कुणालचे आई-वडील किशोर मानसिंग राठोड व सौ. ललिता किशोर राठोड
यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याआधी १५ ऑगस्टला इयत्ता दहावीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा
रोहित संदीप चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
गावच्या सरपंच सौ. सोनाली बबनराव सोळंके यांनी सांगितले की,
“विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना पुढे जाण्यासाठी बळ मिळावे यासाठी
ग्रामपंचायतने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
पुढेही हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार आहे.”
या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल काजळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने,
पशुवैद्यकीय अधिकारी खोडके, जि. प. मुख्याध्यापक समीर देशमुख,
शिक्षिका गीतांजली मोरे, कविता चौधरी, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कारखेडा ग्रामपंचायतीचा हा प्रयोग विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
निर्माण करणारा ठरत असून शिक्षणाच्या गुणवत्तेला चालना देणारा उपक्रम ठरत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ganeshotsavanamitra-cultural-affairs-department-department/