मराठा आंदोलनात शोककळा : सतीश देशमुख यांचा हृदयविकाराने मृत्यू, मनोज जरांगे पाटील संतप्त
मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे.
जुन्नरजवळ मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा प्रवासादरम्यान हृदयविकाराने मृत्यू झाला.
मुंबईत मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करण्यापूर्वीच
ही घटना घडल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दु:ख व्यक्त करताना राज्य सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले,
“आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासादरम्यान कोसळला आणि त्यांना अटॅक आला.
ही अतिशय दुःखद घटना आहे. जर आम्हाला आरक्षण दिलं असतं, तर आमचे बळी गेले नसते.
लातूरमध्येही दोन बळी गेले होते, आता आणखी एक बळी गेला.”
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी
केवळ 8 तासांची परवानगी देण्यात आली आहे.
ही वेळ मान्य करताना त्यांनी पत्रकार परिषदेत संतापही व्यक्त केला.
“एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे.
मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या.
मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदना समजून मुख्यमंत्री फडणवीस यांनी साथ दिली पाहिजे,”
अशी मागणी त्यांनी केली.
रायगड-शिवनेरीच्या प्रेरणेतून आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून,
पुढील काही तासांत मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
