अडगाव बु वार्ताहर :
गणेशोत्सव म्हटला की डीजे, जल्लोष आणि मस्तीची धमाल असा नेहमीचा माहोल असतो.
मात्र अडगाव बु येथील नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ बाजार पुरा यांनी
यंदा या परंपरेला वेगळा पर्याय देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मंडळाच्या वतीने बसस्टँडलगतच्या हिंदू स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
नवनिर्मित गणेशोत्सव मंडळ दरवर्षी पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यास प्रसिद्ध आहे.
याअंतर्गत यापूर्वी ग्रामसफाई, इको-फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,
महिला सक्षमीकरण कार्यक्रम, खेळ स्पर्धा तसेच प्रदूषणमुक्त शोभायात्रा यांसारखे
उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
याही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक भान जपत स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड,
पोलीस इन्स्पेक्टर श्रीराम जाधव, माजी सभापती गोपाल कोल्हे,
तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल पवार यांच्यासह मंडळाचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून,
तरुण पिढीला सामाजिक व पर्यावरणपूरक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.