यवतमाळच्या ’जलसूर्या’चा अस्त
यवतमाळ शहराने आज आपला एक सच्चा पत्रकार आणि जलतरणपटू गमावला.
साधी राहणी, सायकलवरून फिरून बातमीदारी करणारे आणि चेहऱ्यावर नेहमी
स्मितहास्य असलेले उदय कोल्हे काल अचानक जगाचा निरोप घेऊन गेले.
उदय कोल्हे यांनी दोन दशकांहून अधिक काळ दैनिक नवभारतमधून पत्रकारिता केली.
महागड्या गाड्यांच्या दुनियेत त्यांनी सायकलला सोबती केले आणि साधेपणाने लोकांच्या मनात स्थान मिळवले.
मात्र पत्रकारिता हे त्यांचे केवळ उपजीविकेचे साधन होते; त्यांचे पहिले प्रेम जलतरण होते.
प्रशिक्षक वा सुविधा नसताना, स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले.
समुद्राच्या अथांग लाटा छाती ठोकून पार करीत अनेक विक्रम नोंदवले.
डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी त्यांची प्रतिभा ओळखून नंदुरकर विद्यालयात त्यांना जलतरण प्रशिक्षकाची जबाबदारी दिली.
त्यानंतर त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना पोहणे शिकवून राज्यस्तरीय जलतरणपटू घडवले.
कोरोनाच्या काळातही त्यांनी धरणाच्या पाण्यात प्रशिक्षण सुरू ठेवले.
पण आयुष्याच्या या लढवय्या खेळाडूला एक लढाई मात्र जिंकता आली नाही—स्वतःच्या घराची.
वृद्ध आई-वडिलांसाठी छप्पर असावे यासाठी त्यांनी नगरपालिकेचे अनेक उंबरठे झिजवले, परंतु यश आले नाही.
सागर जिंकणारा योद्धा अखेर शहरातील व्यवस्थेपुढे हतबल ठरला.
आज त्यांच्या जाण्याने पत्रकारिता, क्रीडा क्षेत्र आणि यवतमाळचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांची घरासाठीची अपूर्ण लढाई कुणीतरी पुढे नेईल, हाच उदय भाऊंना खरा सन्मान व श्रद्धांजली ठरेल.
Read also : https://ajinkyabharat.com/hivarkhed-police-and-forest-division-gutkha-mafiavar-joint/