अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (26 ऑगस्ट) अहमदाबाद येथे
मारुती सुजुकीच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) प्रकल्पाचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये आता भारतात तयार झालेली इलेक्ट्रिक वाहने
धावतील आणि त्यावर ‘Made in India’ अशी ओळख असणार आहे.
मोदी म्हणाले, “गणेशोत्सवाच्या या मंगलमय वातावरणात भारताच्या ‘मेक इन इंडिया’ प्रवासात आज नवा अध्याय सुरू होत आहे.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ या संकल्पनेकडे हे एक मोठं पाऊल आहे.”
१०० देशांना निर्यात
पंतप्रधानांनी सांगितले की, भारतात बनणारी इलेक्ट्रिक वाहने तब्बल १०० देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत.
याचबरोबर हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोल निर्मितीलाही सुरुवात झाली आहे.
“हा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवा आयाम देणारा आहे,” असेही ते म्हणाले.
मोदींनी सुजुकी कंपनी, जपान सरकार आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
राज्यांसाठी आवाहन
मोदी म्हणाले, “आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. अशा काळात कोणतेही राज्य मागे राहू नये.
प्रत्येक राज्याने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. गुंतवणूकदार भारतात येताना संभ्रमात पडले पाहिजेत की कोणत्या राज्यात जावे,
कारण सर्व राज्ये सुधारणा आणि विकासाभिमुख धोरणांमध्ये स्पर्धा करत आहेत.”
लोकशाही आणि कौशल्याचा लाभ
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारताकडे लोकशाहीची ताकद आहे,
कुशल कार्यबल आहे आणि हाच भारताच्या यशाचा मोठा आधार आहे.
आज जपानची सुजुकी भारतात गाड्या तयार करत आहे आणि त्या गाड्या पुन्हा जपानला निर्यात होत आहेत.
हे केवळ भारत-जपान मैत्रीचे प्रतीक नाही,
तर भारताबद्दल जगभरात वाढत असलेल्या विश्वासाचं दर्शन घडवतं.”