अकोला : भंडाऱ्याचा खर्च रुग्णाच्या उपचारासाठी! आंबेडकर नगरातील मंडळाचा प्रेरणादायी निर्णय
अकोला – समाजातील खरी माणुसकी दाखवत आंबेडकर नगरातील काशी विश्वनाथ खंडेश्वर मंडळाने यंदा दरवर्षीप्रमाणे होणारा कावड यात्रेतील
भंडारा न करता, तो संपूर्ण खर्च परिसरातील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लक्ष्मण जाधव यांच्या उपचारासाठी देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी जाधव यांच्या प्रकृतीसमोर समाजहिताला प्राधान्य देत,
मंडळाने हा खर्च थेट उपचारासाठी वापरण्याचे ठरविले. या निर्णयामुळे आंबेडकर नगरातील सामाजिक ऐक्याचे खरे दर्शन घडले आहे.
लक्ष्मण जाधव गेल्या वर्षभरापासून मणक्याच्या आजाराने त्रस्त असून त्यांना मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेची गरज आहे.
समाजातील कार्यकर्ते ऍडव्होकेट आनंद तायडे यांनी पुढाकार घेत, उपचाराचा अर्धा खर्च स्वतःकडून उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर 28
ऑगस्ट रोजी जाधव यांना मुंबईला नेण्याचेही ठरविण्यात आले आहे.
आनंद तायडे यांनी सांगितले की, “मी माझ्या परीने शक्य ते सहकार्य करत आहे, पण संपूर्ण खर्च पेलणे शक्य नाही. मात्र समाजाने मदतीचा हात दिला, ही खरी
माणुसकी आहे.”
मंडळाच्या वतीने श्री लक्ष्मणजी महाराज, श्री रूपचंद वानखेडे यांनी ही मदत जाहीर केली. या उपक्रमामुळे जाधव कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण
उजाडला आहे.
जाधव परिवाराने मंडळ व समाजातील सर्व रहिवाशांचे आभार मानत सांगितले की, “या आधारामुळे आमच्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण झाली आहे.”