अकोला, मूर्तिजापूर – शेतकऱ्यांचा पोळा हा सण वर्षभर त्यांच्या सोबत न थकता कष्ट करणाऱ्या बैलांचा गौरव करणारा असतो,
मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हा सण आनंदापेक्षा वेदनेचा ठरत असल्याची भावना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याच निषेधार्थ मूर्तिजापूर येथे काल काळा पोळा साजरा करण्यात आला. आंदोलनाची सुरुवात जुनी वस्ती येथे
चंद्रशेखर आजाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. वाजतगाजत बैलजोडीसह मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला आणि तहसील कार्यालयासमोर
दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने बेसनभाकर खाऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची गोड आश्वासने देऊन शेतकऱ्यांची
दिशाभूल केली गेली, मात्र आजतागायत त्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही. महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरीही
शासनाने त्यांच्या वेदनेकडे कानाडोळा केला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पिकविमा व नैसर्गिक आपत्ती मदत निवडणुकीपूर्वी हेक्टरी १३,६०० रुपये तीन हेक्टरपर्यंत होती, मात्र आज ती फक्त हेक्टरी
८,५०० रुपये दोन हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने विदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क कमी करून
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाव घातल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर जिल्ह्यातील व तालुक्यातील
शेकडो शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा संघटक राहुल वानखडे यांनी म्हटले, “शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडवल्या नाहीत, तर आजचा पोळा काळा साजरा केल्याप्रमाणे
येणाऱ्या प्रत्येक सणाला आम्ही काळ्या उत्सवात बदलू. शेतकऱ्यांच्या घामाचा अपमान सहन केला जाणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा
लढा अखंड सुरूच राहील.”
Read also : https://ajinkyabharat.com/pedhi-dhiit-wahoon-galelya-shetkari-yuvacha-deaddeh-sapadla/