10 वर्षांनंतर सोनाली खरेचं मालिकेत पुनरागमन; ‘नशिबवान’ मालिकेत पहिल्यांदाच साकारणार खलनायिका
मुंबई – मराठी मालिकांमधून आपली वेगळी छाप पाडलेली अभिनेत्री सोनाली खरे तब्बल 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत ‘नशिबवान’ मधून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पहिल्यांदाच ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
उर्वशीची दमदार भूमिका
‘नशिबवान’ मालिकेत सोनाली खरे ‘उर्वशी’ हे पात्र साकारणार आहे. दिसायला अतिशय सुंदर परंतु रुपाचा गर्व असलेली, स्वार्थी आणि अतिआत्मविश्वासू अशी
ही व्यक्तिरेखा मालिकेतील मुख्य खलनायिका असेल. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारी उर्वशी मालिकेत प्रेक्षकांच्या रोषाला सामोरी जाणार आहे.
सोनाली खरे काय म्हणाली?
आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना सोनाली खरे म्हणाली, “स्टार प्रवाह परिवारात पुन्हा सामील होणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या करिअरची
सुरुवात मालिकेतून झाली होती, त्यामुळे टीव्ही हे माझं आवडतं माध्यम आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे,
यासाठी खूप उत्सुकता आहे.”
तिने पुढे सांगितले की, “उर्वशी हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी उलट आहे, त्यामुळे कस लागत आहे.
मात्र हा नवा प्रवास मला खूप खास आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या मालिकेचा शुभारंभ होत असल्यामुळे हा सण माझ्यासाठी
अधिकच अविस्मरणीय ठरणार आहे.”
‘बे दुणे दहा’नंतर पुनरागमन
सोनाली खरे याआधी ‘बे दुणे दहा’ मालिकेत झळकली होती. त्यानंतर ती चित्रपट, वेबसीरिज आणि स्वतःच्या निर्मिती संस्थेमध्ये व्यस्त होती.
आता ती ‘नशिबवान’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/alegav-babhugav-marg-durusathi-gramsthanchi-magani/