रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; आलेगाव–बाभुळगाव मार्ग दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी
पातूर– पातूर तालुक्यातील आलेगाव–बाभुळगाव रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या ताब्यात गेला आहे.
या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?” असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
पावसाळ्यामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चिखल व पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघातांची शक्यता दाटली आहे.
दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावर दुचाकी घसरून एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती.
ही घटना अपघातांचा वाढता धोका किती गंभीर आहे याची जाणीव करून देते.
ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत सांगितले की, “रस्ता दुरुस्त न झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका आहे.
त्यामुळे तातडीने पथदुरुस्ती करून मार्ग सुरळीत करावा.”
ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनंतरही अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.
त्यामुळे आता संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून रस्ता सुस्थितीत आणावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/kashipur-harle-9-vichya-vidyarthayakadun-teacher/