वर्षावर राज ठाकरे-फडणवीसांची भेट

"फक्त भेट की काही ‘स्पेशल’?

वर्षावर राज ठाकरे-फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात खलबतांना उधाण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

नागरिकांच्या समस्यांसह पूरस्थिती, मिठी नदीचा प्रश्न आणि मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी यावर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे

सांगितले जात असले तरी, या भेटीला राजकीय महत्त्वही लाभले आहे.

नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे एका मेळाव्यात एकाच मंचावर दिसले होते.

तसेच दहीहंडी उत्सवातही शिवसेना-मनसे नेते एकत्र आले होते. यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.

याआधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यामुळे ठाकरे बंधूंची जवळीक आणि संभाव्य युती यावर चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना ‘युतीबाबत कोणतीही सार्वजनिक भूमिका घेऊ नका’ असे आदेश दिल्याचे समजते.

या सर्व घडामोडींमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट केवळ नागरी समस्यांपुरती मर्यादित आहे की,

त्यामागे राजकीय समीकरणांचे नवे धागेदोरे दडले आहेत, हे स्पष्ट होण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे.

पण सध्या तरी या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/khudavantpur-shivaat-yehe-ati-pavasamu-vihir-kosli/