पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

*पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढाव

*यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश*

*नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश

 

 

*यवतमाळ, दि. १९* : गेले दोन दिवस जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी स्थितीचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करण्यासोबतच नुकसानग्रस्तांना सानुग्रह मदतीचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहे.

जिल्ह्यात संततधार सुरू आहे.बहुतेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी यंत्रणांनी सतर्क राहून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने बचाव व शोध पथके तैनात ठेवण्यात यावे, तलाव व धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने त्यामधून पाणी सोडणे आवश्यक असल्यास रात्रीच्या वेळी पाणी न सोडता दिवसा सोडण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

गेल्या दोन दिवसातील पावसामुळे ठिक-ठिकाणी शेत पिके तसेच घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सानुग्रह मदतीचे वाटप करण्यात यावे. शेत जमिनीचे नुकसान झाले असल्यास सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करावा. अशा जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मदत उपलब्ध करून देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

*ग्रामस्तरीय यंत्रणांनी सतर्क रहावे*

गाव पातळीवर तालुका कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी गावात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावे असे ही त्यांनी सांगितले आहे. हवामान विभागाने तीन दिवस मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांनी घराबाहेर नपडता प्रशासनाने सुचवलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, कुठेही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनास अवगत करावे, असे आवाहनही पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
००००००