उपराष्ट्रपती निवडणूक 2025 : … उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत
उपराष्ट्रपती निवडणूक : विरोधकांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
आता एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा मुकाबला सुदर्शन रेड्डीयांच्यासोबत होणार आहे.
इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवार (१९
ऑगस्ट) रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले की सर्वानुमते त्यांचे नाव निश्चित
करण्यात आले आहे. आता सुदर्शन रेड्डी यांचा मुकाबला एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत होणार आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे, कारण
दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातून आहेत.
इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या दरम्यान मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ”बी. सुदर्शन रेड्डी भारतातील सर्वात प्रतिष्ठित न्यायविदांपैकी एक आहेत. त्यांचा
कायदेशीर कारकिर्दीचा प्रवास मोठा राहिला आहे. या काळात त्यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे न्यायाधीश, गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
म्हणून काम केले आहे. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी सातत्याने काम केले आहे.”
कोण आहेत इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी?
बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील अकुला मायलारम गावात झाला. ते शेतकरी कुटुंबातून येतात. सुदर्शन रेड्डी यांनी प्राथमिक
शिक्षणानंतर हैदराबादचा रुख केला आणि उस्मानिया विद्यापीठातून १९७१ मध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ते अनेक महत्त्वाच्या पदांवर राहिले. सुदर्शन रेड्डी हे माजी न्यायाधीश
असण्यासोबतच गोव्याचे पहिले लोकायुक्त देखील राहिले आहेत.
बी. सुदर्शन रेड्डी यांचा करिअर प्रवास
करिअरची सुरुवात सिव्हिल आणि घटनात्मक प्रकरणांपासून
आंध्र प्रदेश हायकोर्टात सिनियर ॲडव्होकेट प्रताप रेड्डी यांच्यासोबत काम
१९८८-९० या काळात हायकोर्टात सरकारी वकील म्हणून काम
१९९० मध्ये ६ महिन्यांसाठी केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील
१९९५ मध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाचे स्थायी न्यायाधीश
२००५ मध्ये गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश
२००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
२०११ मध्ये निवृत्ती
गोव्याचे पहिले लोकायुक्त
उपराष्ट्रपती निवडणुकीत रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन
एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीतील विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातून आहेत.
राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे झाला. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी आंध्र प्रदेशातील आहेत.