जीएसटी सुधारणा : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाहीत; दारु-सिगारेट मात्र महागण्याची शक्यता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जीएसटी सुधारणा होणार असल्याचं संकेत दिल्यानंतर आता नव्या कररचनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिवाळीपर्यंत किंवा त्यानंतर जीएसटी 2.0 लागू होऊ शकतं. यात 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मात्र, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार नाहीत, असं वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेबाहेरच
पेट्रोलियम उत्पादनांवर केंद्र आणि राज्य सरकारची मोठ्या प्रमाणावर कमाई अवलंबून आहे. त्यामुळे लगेचच पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणलं जाणं अवघड आहे. बिझनेस
टुडेच्या रिपोर्टनुसार, जीएसटी 2.0 लागू झालं तरी इंधनावरील कर कमी होणार नाहीत. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार नाही.
दारु, सिगारेट महागणार?
वित्त मंत्रालयाने नव्या जीएसटी सुधारणांमध्ये विशेष कर रेटसह दोन स्लॅबचा प्रस्ताव मंत्रीगटाला दिला आहे. यात दारु, तंबाखू, सिगारेटवर 40% कर लागू करण्याची शक्यता आहे. जर
हा प्रस्ताव मंजूर झाला, तर या उत्पादनांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील.
गरीब व मध्यमवर्गाला दिलासा
सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. त्याऐवजी 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवण्याचा विचार आहे. सरकारच्या मते हा निर्णय गरीब, मध्यमवर्गीय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना
दिलासा देणारा ठरेल. दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचा खर्च कमी होऊन बचत वाढेल.
अंतिम निर्णय सप्टेंबरमध्ये
जीएसटी सुधारणांवर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषद बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीत दोन स्लॅब लागू करण्यासंदर्भात मंत्रिगट काय ठरवतो,
याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/alka-kubal-aircraft-bhetalya-an-mhanalya-gautami-patilcha-anecdote/