जिल्ह्यांना रेड अलर्ट! अतिवृष्टीने राज्यातील जनजीवन विस्कळीत, बचाव पथक सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस 🛑
राज्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतपिके, घरं आणि पशुधन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले –
राज्यात २१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, १५ ते १६ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात रेड अलर्ट आहे. अंबा, कुंडलिका, जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
नाशिक विभागात तापी व हतनूर नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात बिकट परिस्थिती असून, रावेरच्या काही भागात पाणी शिरले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून पाणी आल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
पुरस्थिती व बचावकार्य
नांदेड जिल्ह्यातील रावनगाव येथे २२५ नागरिक अडकले होते. त्यापैकी प्रतिकूल भागातून नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून उर्वरितांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हसनाळ येथे ८, भासवाडी येथे २० आणि भिंगेली येथे ४० नागरिक अडकले होते, मात्र ते सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
५ नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
बचाव पथकांची चोख कामगिरी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की –
नांदेड जिल्हाधिकारी, लातूर आणि बिदर जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत.
एनडीआरएफची १ चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू बचाव कार्यात गुंतली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडीही रवाना झाली आहे.
स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/dahigav-gavande-complex-dhagfuticha-paus/#