आशिया कप 2025 : शुभमन गिलला संघातून डावललं जाणार? टीम इंडियाच्या निवडीपूर्वी खळबळ
मुंबई | प्रतिनिधी
आशिया कप 2025 (T20 Format) साठी भारतीय संघाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून मंगळवारी बीसीसीआय संघ जाहीर करणार आहे.
मात्र, याआधीच एक मोठा धक्का समोर आला आहे. अलीकडेच शुभमन गिलला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवले जाईल, अशी चर्चा होती.
पण ताज्या घडामोडीनुसार, गिलला संघात स्थानच मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सॅमसन–अभिषेक सलामी जोडीवर निवड समिती खूश
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामी जोडीवर खूश आहे.
त्यामुळे गिलच्या संधी कमी झाल्या आहेत. अगदी यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनाही या संघातून वगळलं जाऊ शकतं.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “भारत सध्या सॅमसन आणि अभिषेक या जोडीसह पुढे जाण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे गिलला संघात स्थान मिळणं कठीण आहे. जैस्वालला सध्या लाल चेंडू क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला गेला आहे.”
9 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरला होणार असून, भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळणार आहे.
त्यानंतर 14 सप्टेंबरला दुबईत भारत–पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना भारत 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळेल.
भारत–पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने?
या स्पर्धेत भारत–पाकिस्तान तीन वेळा भिडू शकतात.
पहिला सामना ग्रुप स्टेजमध्ये,
दुसरा सुपर-4 टप्प्यात,
आणि तिसरा अंतिम सामन्यात, जर दोन्ही संघ पोहोचले तर.
आता सर्वांचे लक्ष मंगळवारी जाहीर होणाऱ्या अधिकृत टीम इंडियाच्या यादीकडे लागले आहे. शुभमन गिलला खरंच या संघातून वगळलं जाणार का, याकडे क्रीडाविश्वाचे डोळे लागले आहेत.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/mansocabatachi-yuti-shiva-sansathi-malignant-kishore-tiwari/